ईव्हिएम यंत्र थांबवण्याचे तंत्र सांगणाऱ्याकडून अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी, आरोपी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : ईव्हिएम यंत्र थांबवण्याचे तंत्र (हॅक) आपल्याकडे असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी एका हाॅटेलमधून एक लाख रुपये घेताना ताब्यात घेतले. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

याप्रकरणाबाबत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, मारोती ढाकणे, असे आरोपीचे नाव आहे. तो नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातला रहिवासी आहे. ढाकणे सैन्य दलामध्ये जवान असून जम्मू काश्मिरमध्ये सेवेत आहे. त्याचे शिक्षण बीए पदवीपर्यंतचे झाले. त्याच्यावर मोठे कर्ज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते कर्ज फेडण्याच्या भामटेगिरीतून ढाकणे याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधून ईव्हिएम यंत्र थांबवण्याचे तंत्र (हॅक) आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने दानवे यांच्याकडे अडीच कोटींची मागणी केली. दानवे यांना संशय आल्याने त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेची संपर्क साधला. दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. दरम्यान, मंगळवारी पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या पथकाने मारोती नावा ढाकणे याला मध्यवर्ती बस स्थानकासमोरील भागातल्या एका हाॅटेलमध्ये एक लाख रुपये घेताना पकडले.

2024-05-07T15:37:27Z dg43tfdfdgfd