कुत्र्याच्या नावाचे आधार कार्ड! दिल्लीत १०० कुत्र्यांना मिळाले आधार कार्ड; जाणून घ्या कसा होणार फायदा?

आधार कार्ड हा भारतातील महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. आधार कार्डद्वारे लोकांची ओळख पटते. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे हे तुम्हाला माहीतच असेल. पण तुम्ही कधी कुत्र्याचे आधार कार्ड पाहिलेय का? आता भटक्या कुत्र्यांची ओळखही आधार कार्डद्वारे पटणार आहे. जगभरात कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुत्र्याला मानवाचा मित्र मानले जाते आणि मोठ्या संख्येने लोक कुत्रा पाळतात. तरीही समाजातील एक घटक कुत्र्यांचा तिरस्कार करतो. त्याला कारण आहे कुत्र्यांची दहशत. अनेक ठिकाणी भटक्या व पाळीव कुत्र्यांनी एवढी दहशत निर्माण केली आहे की, लोकांना तिथून ये-जा करणेही कठीण झाले आहे. या कुत्र्यांनी अनेकांना चावे घेऊन गंभीर जखमीही केले आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांशी संबंधित एक प्रकरण संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले आहे; ज्याबद्दल लोक आश्चर्यचकित होत, त्याचे कौतुक करीत आहेत.

कुत्र्याच्या नावाचे आधार कार्ड

दिल्ली विमानतळावर २७ एप्रिल रोजी एकूण १०० कुत्र्यांना QR-आधारित ‘आधार कार्ड’ देण्यात आले आहे. दिल्ली T1 विमानतळ, इंडिया गेट व प्रसिद्ध NGO Pawfriend.in सह विविध ठिकाणी असणाऱ्या कुत्र्यांना हे आधार कार्ड देण्यात आले आहे. प्राण्यांचे रक्षण आणि संरक्षण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. कुत्रे इकडे-तिकडे भटकतात, हरवतात यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन, मानवी राय यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले, “आज मला हे सांगताना आनंद होत आहे की, हे QR-आधारित टॅग आमच्या प्रेमळ मित्रांसाठी, विशेषत: संकटाच्या वेळी त्यांना जीवनदायी ठरतील.”

आधार कार्डचा कसा होणार फायदा?

कुत्र्यांसाठी तयार करण्यात आलेले क्यूआर आधार कार्ड कसे काम करते? तर यामध्ये एक क्यूआर कोड स्कॅनर बसविण्यात आला आहे; ज्यामध्ये त्या कुत्र्याशी संबंधित सर्व प्रकारची माहिती नमूद केलेली असेल. त्यामुळे तुम्ही तो क्यूआर कोड स्कॅन करताच, तुम्हाला त्या कुत्र्याचे नाव काय, त्याचे लसीकरण करण्यात आलेय की नाही आणि असल्यास, केव्हा गेलेय ते कळेल. त्याशिवाय त्या स्कॅनरमध्ये नसबंदीसह वैद्यकीय तपशीलही आहेत. हा अनोखा उपक्रम पॉफ्रेंड डॉट इन नावाच्या संस्थेने सुरू केल्याचे सांगितले जात आहे. त्यांनीच कुत्र्यांची ओळखपत्रे बनवली आहेत. संबंधित कुत्रा हरवल्यास त्याला शोधण्यासाठी क्यूआर कोडची मदत होईल.

हेही वाचा >> सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठा बदल; १ जूनपासून लागू होणार नवा नियम; जाणून घ्या काय बदललं?

Pawfriend.in ही एक अग्रगण्य स्वयंसेवी संस्था (NGO) आहे. ती भारतातील भटक्या प्राण्यांचे कल्याण आणि संरक्षण व्हावे यासाठी धडपडत असते. Pawfriend.in ही नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे प्राण्यांसाठी अधिक सुरक्षित आणि अधिक दयाळू वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करते. भटक्या कुत्र्यांची असुरक्षितता ओळखून, विशेषत: मोठ्या कार्यक्रमांदरम्यान, T1 विमानतळावर आणि इंडिया गेटवर २५ कुत्र्यांना आधार कार्डे देण्यात आली. या QR-आधारित ‘आधार कार्ड्स’मध्ये फिडर तपशील आणि आपत्कालीन संपर्कांसह, हरवलेल्या कुत्र्यांना मदत करणारी महत्त्वाची माहिती नमूद केलेली असते. दिल्लीतील सर्व प्राणीप्रेमींसाठी हा आनंदाचा क्षण मानला जात आहे.

2024-04-30T07:54:22Z dg43tfdfdgfd