मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक

मुंबई : गेल्या ४० वर्षांपासून फरार असलेला आरोपी पापा ऊर्फ दाऊद बंदु खानला (७०) आग्रा येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. आरोपी अटक टाळण्यासाठी ओळख बदलून राहत होता. डी. बी. मार्ग पोलिसांनी विशेष मोहीम राबवून त्याला अटक केली. बलात्कार प्रकरणातील आरोपी पापा ऊर्फ दाऊद बंदु खान याला १९८४ साली अटक झाली होती. याप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीस दाऊद अनुपस्थित राहू लागला. अखेर सत्र न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. दाऊद गेल्या ४० वर्षांपासून फरार होता व त्यामुळे या प्रकरणातील खटला न्यायालयात प्रलंबित होता.

निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त, परिमंडळ – २ यांनी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदर गुन्ह्यातील फरारी आरोपीचा मुंबईमधील फॉकलॅन्ड रोड येथे शोध घेण्यात आला. मात्र तो सापडला नाही. पोलिसांच्या पथकाने परिसरात चौकशी केली असता दाऊद फॉकलॅन्ड रोड येथील राहते घर विकून कुटुंबासमवेत उत्तर भारतात निघून गेल्याची माहिती मिळाली. परंतु आरोपी नेमका कुठे निघून गेला हे पथकाला समजू शकले नाही.

हेही वाचा : बोगस डॉक्टरांविरोधात ‘एमएमसी’चे आक्रमक धोरण

पोलीस हवालदार राणे यांनी दाऊदच्या संपर्कातील व्यक्तींकडे चौकशी सुरू केली. एका खबऱ्याकडून त्यांना दाऊदचा ठावठिकाणा समजला. मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली. आरोपी आग्रा परिसरात असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कोयंडे व पथक आग्रा येथे रवाना झाले. आग्रा परिसरात आरोपी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. तांत्रिकपध्दतीने माहितीची पडताळणी करून दाऊद राहत असलल्या परिसरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. दाऊदला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले आहे.

2024-05-07T08:21:36Z dg43tfdfdgfd