मुख्यमंत्री बनण्यासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले; एकनाथ शिंदे यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, भूमिका बदलली. जी दूषणे आम्हाला लावत आहात, ती तुम्हालाच लागू आहे. सत्ता घालवली आणि काय मिळवले? शिवसैनिकांचे खच्चीकरण होताना पाहिले. त्यांना विचारभूमिका नको आहे. त्यांना फक्त पैसे हवे आहेत. मातोश्री म्हणजे लेना बँक आहे, देना नाही, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावर केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर भागात जाहीर सभेत ते बोलत होते.

मातोश्रीवर पैसे पाठवावे लागायचे असे चंद्रकांत खैरे यांनी एका चित्रफितीत मान्य केले आहे, असा आरोप महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणापूर्वी केला होता. तो धागा पकडून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या सभासद नोंदणीत जमलेले ५० कोटी रुपये त्यांनी मागवून घेतले. त्याला कसलाही विरोध न करता ती रक्कम त्यांना दिली. कारण आम्हाला विचार आणि भूमिका हव्या होत्या, पैसे त्यांना हवे आहेत, असे शिंदे म्हणाले. छत्रपती संभाजीनगरचा हे हिंदुत्वाचे शक्तिपीठ आहे. त्यामुळे या गावचा सातबारा शिवसेनेचा आहे. तो तसाच राहावा यासाठी इथले लोक ‘नकली’ शिवसेनेला बाराच्या भावात काढतील, असे म्हणत अयोध्येतील राममंदिर, ३७० कलम ही आश्वासने पूर्ण करणाऱ्या महायुतीलाच येथील लोक स्वीकारतील, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> उदयनराजेंविरुध्द शशिकांत शिंदे  प्रतिष्ठेच्या लढतीचा कौल सीलबंद; कमळ की तुतारी आतापासूनच उत्सुकता

राममंदिराच्या स्थापनेच्या वेळी तुम्हाला निमंत्रण देऊनही तुम्ही गेला नाहीत. जो रामाचा नाही, तो कामाचा नाही असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मतदान करावे, असे आवाहन केले. गेली २० वर्षे खासदार म्हणून काम करणारे चंद्रकांत खैरे यांना विकासाचे एकही काम दाखवता येत नाही. ३५ वर्षांच्या राजकारणात ३० वर्षे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलो आहे. आजही धनुष्यबाण हेच चिन्ह आहे. मग आम्ही गद्दार कसे, असा प्रश्न भूमरे यांनी यावेळी जाहीरपणे विचारला. करोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गायब होते. आम्हाला भेटत नव्हते आणि अडीच वर्षांत फक्त पाच वेळा ते मंत्रालयात आले. त्यामुळे त्या काळात विकासच झाला नाही, असा आरोपही भूमरे यांनी केला. यावेळी मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड, आमदार संजय शिरसाट यांची भाषणे झाली.

2024-05-07T17:23:02Z dg43tfdfdgfd