THIRD PHASE VOTING PERCENTAGE: तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, आसाममध्ये मतदारांचा सर्वाधिक प्रतिसाद

Lok Sabha Elections 2024 Phase 3, Third Phase Voting Percentage: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपले आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील 11 राज्यांतील 93 जागांवर मतदान झाले. यात गुजरातमधील 26, कर्नाटकातील 14, महाराष्ट्रातील 11, उत्तर प्रदेशातील 10, मध्य प्रदेशातील 8, छत्तीसगडमधील 7, बिहारमधील 5, आसाममधील 4, पश्चिम बंगालमधील 4 आणि गोव्यातील 2 जागांवर मतदान होत आहे. याशिवाय दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या 2 मतदारसंघाचा समावेश होता.

तिसऱ्या टप्प्यात आसाममध्ये सर्वाधिक 75.26 टक्के मतदान झाले, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 54.77 टक्के मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रात या टप्प्यात रायगड, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले, माढा, लातूर, धाराशिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडली. तिसऱ्या टप्प्यात देशात 61.55% टक्के मतदान झाले आहे, तर महाराष्ट्रात 54.77 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

कोणत्या राज्यात किती मतदान?

क्रमांकराज्यजागांची संख्यामतदानाची टक्केवारी
1.आसाम475.26%
2.बिहार556.55%
3.छत्तीसगड766.99%
4.दादरा नगर हवेली आणि दमण दीव265.23%
5.गोवा274.27%
6.गुजरात2556.76%
7.कर्नाटक1467.76%
8.मध्य प्रदेश963.09%
9.महाराष्ट्र1154.77%
10.उत्तर प्रदेश1057.34%
11.पश्चिम बंगाल473.93%

तिसऱ्या टप्प्यातील एकूण मतदानाची टक्केवारी किती आहे?

देशातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 93 मतदारसंघांमध्ये 61.55 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालच्या काही भागात तुरळक हिंसाचाराची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात धाराशिवमध्ये एका मतदान केंद्रावर मतदानाच्या वादातून एकाची हत्या झाली. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची अधिकृत वेळ संध्याकाळी 6 वाजता होती. मतदान केंद्रांवर रांगेत उभे असलेल्या मतदारांना संध्याकाळी 6 वाजल्यानंतरही काही ठिकाणी मुदत वाढवून मतदानाची संधी देण्यात आली. आयोगाच्या म्हणण्यानुसार हे "अंदाजे" आकडे आहेत आणि तपशील गोळा केल्याने त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

4 जून रोजी निकाल

तिसऱ्या टप्प्यात सुमारे 120 महिलांसह 1,300 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या दोन टप्प्यात एकूण 543 जागांपैकी 189 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. पुढील चार टप्प्यात 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

2024-05-07T20:15:34Z dg43tfdfdgfd