‘केसीआर’ यांची अस्तित्वाची लढाई

[author title=”के. श्रीनिवासन, राजकीय विश्लेषक” image=”http://”][/author]

गेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर ‘केसीआर’ यांच्या नेतृत्वाखालील बीआरएसने तेलंगणात सर्वाधिक नऊ जागा जिंकल्या. दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी प्रत्येकी तीन-तीन जागा जिंकल्या होत्या. ‘केसीआर’ आता राज्यातील सत्तेत नाहीत. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेसने जागांची संख्या वाढविण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लोकसभा निवडणूक ‘केसीआर’ यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे.

तेलंगणात लोकसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला असून, माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे अस्तित्व टिकवण्यासाठी निकराची लढाई करत आहेत. तेलंगणात सलग 10 वर्षे राज्य केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचे पतन झाले आणि काँग्रेस पक्ष सत्तेत विराजमान झाला. आता लोकसभा निवडणुकीतही केसीआर यांच्यासमोरील आव्हाने कमी होताना दिसत नाहीत. बीआरएस स्थापनेच्या वेळी त्यांच्यासमवेत असणारे खंबीर साथीदार सोडून जात आहेतच, याशिवाय कन्या के. कविता तुरुंगात असल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. एकुणातच केसीआर यांच्यासमोर राजकीय पेच उभा राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने केसीआर यांची चांगलीच कोंडी केली आहे. 2029 मध्ये बीआरएसने राज्यातील सतरापैकी नऊ जागा जिंकल्या होत्या; मात्र यंदा एवढ्या तरी जागा जिंकण्यात यश येईल का, असा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाने केसीआर यांची राजकीय वाटचाल खडतर झाली आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीआर यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती, तरीही त्यांच्या मतांत 10 टक्के घट झाली. दुसरीकडे काँग्रेसने मतांच्या टक्केवारीत वाढ करत त्यांना सत्तेतून खाली खेचले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या दणक्यातून केसीआर अजूनही सावरलेले नाहीत आणि त्यानंतर नेत्यांची गळती सुरू झाली. पक्षाच्या चार विद्यमान खासदारांसह अनेक आमदार आणि माजी आमदारांनी राजीनामा देत अन्य पक्षांत प्रवेश केला. बीआरएसमधील या अनागोंदीमागे महत्त्वाचे कारण म्हणजे केसीआर नव्याने सक्षमपणे उभे राहू शकतील की नाही, असा प्रश्न पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत निर्माण झाला आहे.

केसीआर हे सक्षम आणि खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले गेले आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, केसीआर हे पुन्हा नव्याने उभारी घेऊ शकतात; परंतु त्यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे त्यांचा राजकीय मार्ग खडतर झाला आहे. केसीआर यांच्या काळातील भ्रष्टाचाराचा डंका संपूर्ण राज्यात वाजला आहे. अशावेळी केसीआर यांच्यासाठी नव्याने राजकीय बळ उभा करणे कठीण आहे. बीआरएसच्या अधोगतीला त्यांचा स्वभावही कारणीभूत असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. त्यांच्या मते, केसीआर यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत मनमानीप्रमाणे निर्णय घेतले आणि त्यांची ही भूमिका पक्षाला एकप्रकारे घातक ठरली. त्यांच्या निकटवर्तीय प्रमुख नेत्यांनी त्यांची साथ सोडली. परिणामी, त्यांना राजकीय अस्तित्व टिकवणे वाटते तेवढे सोपे नाही.

विशेष म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपांनीही केसीआर भयभीत झाले आहेत. दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहारात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह केसीआर कन्या के. कविताही अडकल्या आहेत. या प्रकरणी सध्या त्या तुरुंगात आहे. एकीकडे आम आदमी पक्षांकडून केजरीवाल यांच्या अटकेवरून रान उठविले जात असताना आणि दिल्लीत प्रचारात सर्व पोस्टर्सवर केजरीवालांचीच छाप दिसून येत असताना तेलंगणात मात्र तसे चित्र दिसत नाही. केसीआर हे निवडणूक सभांत मुलीच्या अटकेचा मुद्दा प्रभावीपणे मांडताना दिसून येत नाहीत.

दोन दशकांत पहिल्यांदाच केसीआर यांचे कुटुंब लोकसभेच्या रणभूमीत नसल्याचे दिसून येते. 2001 मध्ये टीआरएस (आताचे बीआरएस) स्थापनेनंतर पहिल्यांदाच केसीआर कुटुंबातील एकही व्यक्ती मैदानात नाही. केसीआर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी 2004 नंतर प्रत्येक लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत शड्डू ठोकला होता. त्या काळात तेलंगणा आंदोलन सक्रिय करण्यासाठी आणि या चळवळीला टीआरएस पक्षाचे रूप देण्यासाठी केसीआर यांनी तेलगू देसममधून राजीनामा दिला आणि स्वतंत्रपणे करीमनगरची लोकसभा आणि सिद्दीपेठची विधानसभा लढवली होती.

दोन्ही जागांवर ते निवडून आले; मात्र सिद्दीपेठची जागा सोडली आणि ते केंद्रातील काँग्रेस नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये मंत्री झाले. त्यानंतर केसीआर यांचे पुतणे आणि टीआरएसचे नेते हरिश राव हे पोटनिवडणुकीत सिद्दीपेठ येथून निवडून आले; मात्र दोनच वर्षांत तेलंगणाच्या मुद्द्यावर काँग्रेसशी मतभेद झाले आणि 2006 आणि 2008 मध्ये करीमनगरमध्ये झालेल्या दोन पोटनिवडणुकांत टीआरएस संस्थापकांनी विजय मिळवला. 2009 मध्ये केसीआर मेहबुबनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. या कार्यकाळात ते तेलंगणा राज्यांचे ध्येय मिळवण्यात यशस्वी ठरले. 2014 मध्ये केसीआर यांनी मेदक लोकसभा आणि गझवेल विधानसभा लढवली. या दोन्ही ठिकाणी ते जिंकून आले.

119 सदस्यीय तेलंगणा विधानसभेत टीआरएस यांना बहुमत मिळाल्यानंतर नव्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी मेदकची जागा सोडली. त्याच निवडणुकीत केसीआर यांची मुलगी के. कविता निझामाबाद येथून लोकसभेवर निवडून गेल्या. केसीआर यांचा मुलगा, पुतण्या हे पुन्हा अनुक्रमे सिरसिला आणि सिद्दीपेठ येथून विधानसभेत निवडून आले. ते मंत्री झाले. 2022 मध्ये केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारणावर लक्ष केंद्रित करत टीआरएसचे नाव बदलून बीआरएस केले; पण राज्यात 10 वर्षे सरकार चालविल्यानंतर पक्षाने मागच्या वर्षी पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला आणि सत्तेतून पायउतार झाले. केसीआर यांनी दोन विधानसभा मतदारसंघ गझवेल आणि कामारेड्डी येथून निवडणूक लढवली होती. त्यांनी गझवेलची जागा राखली; मात्र कामारेड्डी येथून ते पराभूत झाले. एकूणच केसीआर यांची राजकीय कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

2024-05-08T02:06:23Z dg43tfdfdgfd