बारामतीत सर्वात कमी मतदान

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी राज्यात मंगळवारी रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, लातूर, कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, सातारा, बारामती, माढा, सोलापूर आणि धाराशिव या 11 मतदारसंघांत सरासरी 61.44 टक्के मतदान झाले. केवळ राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सर्वात कमी 56 टक्के मतदान झाले. कोल्हापूर मतदारसंघात सर्वाधिक 70.35 टक्के मतदान झाले.

तिसर्‍या टप्प्यात राज्यात 11 पैकी 7 मतदारसंघांत 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. राज्यात पहिल्या दोन टप्प्यांत अनुक्रमे 63.71 टक्के व 62.71 टक्के मतदान झाले होते. तिसर्‍या टप्प्यातही या मत टक्केवारीच्या जवळपासच मतदान झाले आहे. पहिल्या दोन टप्प्यांत सर्वाधिक 72.88 टक्के मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात झाले होते. कोल्हापूरमध्ये त्याखालोखाल मतदान झाले असून, पहिल्या तीन टप्प्यांतील सर्वाधिक मत टक्क्याच्या क्रमवारीत कोल्हापूरचा दुसरा क्रमांक लागतो.

पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची टक्केवारी पाहता तिसर्‍या टप्प्यात मतांची टक्केवारी 75 टक्क्यांपर्यंत नेण्याचे निवडणूक आयोगाने उद्दिष्ट ठेवले होतेे. मात्र, मतदारांमधील निरुत्साह पाहता ते गाठता आले नसल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसते. तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी कोल्हापूर, हातकणंगलेसह रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, लातूर, सांगली, सातारा, बारामती, माढा, सोलापूर आणि धाराशिव या 11 मतदारसंघांसाठी मतदान झाले. दरम्यान, कोल्हापूर आणि महाडमध्ये दोघांचा मृत्यू झाला. अन्यत्र किरकोळ बाचाबाची आणि हाणामारीचे प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.

वाढते तापमान आणि मतदारांचा निरुत्साह पाहता सकाळपासूनच त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी उमेदवारांच्या यंत्रणा कामाला लागल्या होत्या. सकाळी अकरापर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी दिसत होती. मात्र, ती नंतर ओसरू लागली. दुपारी चारनंतर मतदारांची संख्या वाढेल, असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरला.

निवडणूक आयोगाने केंद्रांसमोर मंडप टाकण्याबरोबरच पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र, एकूणच मतदारांचा उत्साह दिसून आला नाही.

ईव्हीएम पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

सोलापूर जिल्ह्यात सततच्या पाणीटंचाईला सामारे जावे लागत असल्याबद्दल संताप व्यक्त करत बागलवाडी (ता. सांगोला) येथील केंद्रावर एकाने ईव्हीएम पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. निवडणूक निर्णय अधिकार्‍याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दादासो मनोहर चळेकर यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चाकणकरांविरोधात गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रूपाली चाकणकर यांनी पुण्यातील खडकवासला परिसरातील मतदान केंद्रात ईव्हीएमची पूजा केल्याने निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात आ. रोहित पवार यांनी अजित पवार गटाकडून पैसे वाटल्याचा आरोप केला. त्याचे खंडन करीत अजित पवार यांनी रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. रोहित पवार यांनी दत्ता भरणे यांच्याकडून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओही ट्विट केला. सुप्रिया सुळे यांनी भरणे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे.

सर्व 11 ठिकाणी ‘हायव्होल्टेज’ लढती

कोल्हापूर : शाहू महाराज-खा. प्रा. संजय मंडलिक

हातकणंगले : खा. धैर्यशील माने-राजू शेट्टी-सत्यजित पाटील-सरूडकर

सांगली : खा. संजय पाटील-विशाल पाटील-चंद्रहार पाटील

सातारा : खा. उदयनराजे भोसले-शशिकांत शिंदे

बारामती : खा. सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार

सिंधुदुर्ग : खा. विनायक राऊत-केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे

रायगड : खा. सुनील तटकरे-अनंत गीते

सोलापूर : प्रणिती शिंदे-राम सातपुते

माढा : खा. रणजितसिंह निंबाळकर-धैर्यशील मोहिते-पाटील

धाराशिव : खा. ओमराजे निंबाळकर-अर्चना पाटील

लातूर : खा. सुधाकर शृंगारे-डॉ. शिवाजी काळगे

2024-05-08T01:54:57Z dg43tfdfdgfd